पुनर्वसनाच्या प्रलंबित प्रश्नांना मिळणार गती; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक आढावा बैठक
जळगाव, दि. २ जून (प्रतिनिधी) जिल्ह्यातील पुनर्वसन विषयक प्रलंबित प्रश्नांचा तातडीने निपटारा करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित विभागांची व्यापक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पुनर्वसित गावठाणांतील विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीत पात्र लाभार्थ्यांना भूखंड वाटप, पुनर्वसित

क्षेत्रातील रस्ते, पाणीपुरवठा व वीज यांसारख्या नागरी सुविधांची सद्यस्थिती, भूमी अभिलेख विभागाकडे प्रलंबित असलेल्या जमीन मोजणीची प्रकरणे, न्यायालयीन बाबी तसेच प्रकल्पग्रस्तांच्या स्थानिक अडचणींचा तपशीलवार आढावा घेण्यात आला.
यावेळी जिल्हा अधीक्षक (भूमी अभिलेख), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), उपजिल्हाधिकारी, पाटबंधारे, मध्यम प्रकल्प व धरण विभागाचे कार्यकारी अभियंते, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच उपअधीक्षक भूमी अभिलेख हे प्रत्यक्ष व दूरचित्रवाणी प्रणालीद्वारे (व्हीसी) उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्तांचे हित लक्षात घेऊन सर्व विभागांनी परस्पर समन्वय वाढवून प्रलंबित विषयांना गती द्यावी व निर्धारित कालमर्यादेत त्यांची पूर्तता करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. या बैठकीमुळे जिल्ह्यातील पुनर्वसनाशी संबंधित अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
