मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सत्कार

जळगाव | प्रतिनिधी : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर आयुष्यातील प्रत्येक अडथळ्यावर मात करता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे जामनेर तालुक्यातील खडकी गावातील रिक्षाचालक रंगलाल फत्रू नाईक यांच्या कन्या ममता रंगलाल नाईक. अत्यंत सामान्य परिस्थितीतून पुढे येत त्यांनी क्रीडा, शिक्षण आणि समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून अल्पवयातच राज्यभरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सध्या ममता नाईक या स्पोर्ट्स टीचर, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या, बेस्ट स्पोर्ट्स टीचर तसेच सेल्फ डिफेन्स कोच म्हणून कार्यरत आहेत. कराटे, सेल्फ डिफेन्स, योग आणि विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण देत त्या शेकडो विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि देशप्रेमाची भावना रुजवत आहेत. विशेष म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना त्या निःशुल्क प्रशिक्षण व मार्गदर्शन देत असून, ग्रामीण भागातील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देऊन त्यांना सक्षम बनविण्याचे कार्य सातत्याने करत आहेत.
त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत २३ जुलै २०२६ रोजी पुणे येथे आनंदी फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपट अभिनेत्री पूजा वाघ यांच्या हस्ते त्यांना “महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२६” प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, विद्यार्थ्यांसाठीचे समर्पण आणि सामाजिक बांधिलकीची पोचपावती मानला जात आहे.
याच वर्षात त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करत ज्ञानदीप सामाजिक संस्थेतर्फे “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६” तसेच “अटल बिहारी वाजपेयी सेवा रत्न सन्मान २०२६” देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. अवघ्या एका वर्षात तीन प्रतिष्ठित राज्यस्तरीय पुरस्कार मिळविण्याची ही उल्लेखनीय कामगिरी त्यांच्या अथक परिश्रमांची आणि समर्पणाची साक्ष देणारी ठरली आहे.
“माझ्या यशामागे माझ्या आई-वडिलांचे कष्ट, गुरूंचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचे प्रेम आहे. प्रत्येक मुलगी आत्मविश्वासाने उभी राहावी, प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला क्रीडा शिक्षणाची संधी मिळावी आणि आपल्या गावातील युवकांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करावीत, हेच माझे ध्येय आहे,” असे ममता नाईक यांनी सांगितले.
रिक्षाचालकाच्या कन्येने मिळवलेले हे यश केवळ त्यांच्या कुटुंबापुरते मर्यादित नसून खडकी गाव, जामनेर तालुका, जळगाव जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळे अनेक ग्रामीण भागातील मुली, युवक आणि विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळत असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. “जिद्द असेल तर परिस्थिती कधीच आडवी येत नाही,” हे ममता नाईक यांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.
जामनेर येथे एका कार्यक्रमा निमित्ताने ममता हजार असताना ,मंत्री गिरीश महाजन यांना मताच्या राज्यस्तरीय पुरस्काराची माहिती कळताच,मंत्री गिरीश महाजन यांनी ममता ला स्टेज वरती बोलावून तिचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

