यावलच्या विकासासाठी सत्ताधारी नगरसेवक एकवटले; ७ कोटींच्या निधीची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

यावल : यावल शहरातील विकासकामांना गती मिळावी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी सत्ताधारी नगरसेवक व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत ७ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली.

या भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रतिभा शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांचे सहकार्य लाभले. यावल शहरातील विविध विकासकामांसाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष कदीर खान, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक उमेश फेगडे, विद्यमान नगरसेवक हेमराज फेगडे उर्फ बाळूदादा तसेच भाजपाच्या गटनेत्या नंदा महाजन यांचे चिरंजीव उपस्थित होते. यावल शहराच्या विकासासंदर्भातील विविध मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

विशेषतः यावल शहरातील अल्पसंख्याक भागाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

अल्पसंख्याक भागासह शहरातील विविध विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

शासनाकडून ७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यास यावल शहरातील अनेक प्रलंबित विकासकामांना चालना मिळणार असून, नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

error: Don't Try To Copy !!