भडगावात विद्युत उपकेंद्राला चोरट्यांचा डल्ला; ४ लाख ६० हजारांचा ऐवज लंपास

१२ किलो तांब्याच्या कॉपर कॉईलसह ट्रान्सफॉर्मर ऑईलची चोरी

भडगाव : तालुक्यातील कजगाव येथील विद्युत उपकेंद्रात चोरट्यांनी धाडसी चोरी करत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत उपकेंद्रातील सुमारे ३ लाख रुपये किमतीची तसेच अंदाजे १२ किलो वजनाची कॉपर कॉईल आणि सुमारे १ लाख ६० हजार रुपये किमतीचे ऑईल चोरीस गेल्याचे समोर आले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कजगाव (ता. भडगाव) येथील विद्युत उपकेंद्रात २२ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश केला. यावेळी उपकेंद्रातून विविध वस्तूंची चोरी करण्यात आली.

या प्रकरणी २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा रजिस्टर क्रमांक २७२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांन्वये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास केला जात आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, चोरट्यांना लवकरात लवकर अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

error: Don't Try To Copy !!