जळगाव रेल्वे स्थानकावर शिवाजीनगरकडील नवी तिकीट खिडकी सुरू; प्रवाशांची मोठी गैरसोय टळणार

Jamner | प्रतिनिधी
जळगाव रेल्वे स्थानकाच्या उत्तर बाजूस, शिवाजीनगरकडील प्रवेशद्वाराजवळ प्रवाशांसाठी नूतनीकृत आरक्षित रेल्वे तिकीट खिडकी सुरू करण्यात आली आहे. गुरुवारपासून ही सुविधा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली असून, त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या मुख्य तिकीट खिडकीवर होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
जळगाव रेल्वे स्थानकावर दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची ये-जा असते. विशेषतः सकाळी, सुट्टीच्या दिवसांत तसेच सण-उत्सवांच्या काळात तिकीट खिडकीवर मोठी गर्दी होत असल्याने प्रवाशांना बराच वेळ रांगेत उभे राहावे लागत होते. अनेकदा वेळेअभावी प्रवाशांची गैरसोयही होत होती.
ही समस्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगरकडील प्रवेशद्वाराजवळ नवीन तिकीट खिडकीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या खिडकीवर संगणकीकृत पद्धतीने आरक्षित रेल्वे तिकिटांची सुविधा उपलब्ध होणार आहे.
गर्दीचे व्यवस्थापन होण्यास मदत
नवीन तिकीट खिडकी सुरू झाल्यामुळे स्थानकाच्या मुख्य भागातील तिकीट खिडकीवरील प्रवाशांचा दबाव कमी होण्याची शक्यता आहे. विशेषतः शिवाजीनगर परिसरातून स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना आता तिकीट काढण्यासाठी स्थानकाच्या मुख्य भागापर्यंत जाण्याची गरज भासणार नाही.
प्रवाशांकडून समाधान व्यक्त
नवीन सुविधेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून तिकीट काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. शिवाजीनगरकडील नागरिक आणि रेल्वे प्रवाशांनी या सुविधेचे स्वागत केले असून, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

error: Don't Try To Copy !!