जळगाव : बन्सल क्लासेस, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक सन्मान सोहळ्यात निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक जयप्रकाश रामराव पाटील यांचा गौरव करण्यात आला. जळगाव येथील हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास आदरणीय खासदार स्मिताताई वाघ तसेच भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, दिल्ली येथील अधिकारी आदरणीय सौरभजी चितलांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न तसेच विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये दिलेल्या योगदानाची दखल घेत मुख्याध्यापक जयप्रकाश पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बन्सल क्लासेसचे संचालक आदरणीय हेमंत दिलीप आगीवाल यांचीही प्रमुख उपस्थिती होती. शिक्षकांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या योगदानाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्याध्यापक जयप्रकाश पाटील यांच्या या सन्मानाबद्दल निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या कार्याचा झालेला हा गौरव विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यामुळे नवी ऊर्जा मिळणार आहे.

