जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयच्या प्रवेशद्वाराबाहेरील कचरा संकलन केंद्र तातडीने हटविण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. आयटीआय परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा साचत असून, त्यातून दुर्गंधी तसेच डास-माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप अभाविपने केला आहे.
आयटीआय परिसराच्या आसपास जवळपास सहा महाविद्यालये असून, दररोज हजारो विद्यार्थी या मार्गाने ये-जा करतात. प्रवेशद्वारालगतच कचरा साचत असल्याने विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांनाही दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे अभाविपचे म्हणणे आहे. विशेषतः पावसाळ्यात साचलेल्या कचऱ्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून साथीचे व संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, अशी चिंता संघटनेने व्यक्त केली आहे.
या समस्येबाबत महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, असा आरोप अभाविपने केला आहे. कचरा संकलन केंद्रामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने दखल घेऊन हे केंद्र अन्यत्र हलवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, मागणीची दखल घेऊन तातडीने कारवाई न झाल्यास उद्या आयटीआयच्या प्रवेशद्वाराबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिला आहे. त्यामुळे आता मनपा प्रशासन या प्रश्नावर कोणती भूमिका घेते, याकडे विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

