साई ऐझॉल केंद्राला भेट; खेळाडू व प्रशिक्षकांशी साधला संवाद, ईशान्य भारतातील क्रीडा प्रतिभेला अधिक संधी देण्यावर भर
ऐझॉल, दि. १५ सप्टेंबर २०२६ : केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी ऐझॉल येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) केंद्राला भेट देत मिझोराममधील क्रीडा पायाभूत सुविधा, खेळाडूंचे प्रशिक्षण आणि क्रीडा विकासाचा आढावा घेतला. यावेळी मिझोरामचे क्रीडा व युवा सेवा मंत्री पु. लालंघिंगलोवा हमार यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी रक्षा खडसे आणि मिझोरामचे क्रीडा व युवा सेवा मंत्री यांच्यात राज्यातील क्रीडा विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वय अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा झाली. तसेच SAI केंद्रातील खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांशी रक्षा खडसे यांनी संवाद साधला. खेळाडूंचा प्रशिक्षण अनुभव, विविध स्पर्धांमधील सहभाग आणि भविष्यातील उद्दिष्टांबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे सहाय्यक संचालक श्री. शिवम यादव यावेळी उपस्थित होते. ईशान्य भारतातील युवा खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षणासोबतच क्रीडा विज्ञान, पुनर्वसन, पोषण आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यावर रक्षा खडसे यांनी भर दिला.
खेलो इंडिया उपक्रमातून क्रीडा सुविधांना बळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील क्रीडा संस्कृती अधिक व्यापक करण्यासाठी तसेच तळागाळातील प्रतिभावान खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ‘खेलो इंडिया’ उपक्रमाच्या माध्यमातून विविध प्रयत्न सुरू आहेत. मिझोरामसह ईशान्य भारतातील क्रीडा प्रतिभेला या माध्यमातून अधिक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर रक्षा खडसे यांनी भर दिला.
ऐझॉल येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रशिक्षण केंद्रात खेलो इंडिया अंतर्गत सिंथेटिक हॉकी टर्फ आणि प्रकाशयोजना उभारण्याचा प्रकल्पही क्रीडा पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.
लालरेम्सियामी हमारझोटे यांचे उल्लेखनीय उदाहरण
मिझोराममधील क्रीडा प्रतिभेचे उदाहरण म्हणून लालरेम्सियामी हमारझोटे यांचा उल्लेख करण्यात आला. थेंझॉल येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अकादमीत प्रशिक्षण घेतलेल्या लालरेम्सियामी या मिझोरामच्या पहिल्या महिला ऑलिम्पियन आणि पहिल्या आशियाई क्रीडा पदकविजेत्या ठरल्या आहेत. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांची अर्जुन पुरस्कार २०२५ साठी निवड झाली आहे.
ईशान्य भारतात मोठी क्रीडा प्रतिभा आणि मजबूत क्रीडा संस्कृती आहे. क्रीडा सुविधा, दर्जेदार प्रशिक्षण तसेच केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वय अधिक मजबूत करून या प्रतिभेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे नेण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे रक्षा खडसे यांनी यावेळी अधोरेखित केले.


