जामनेरचे सुपुत्र इंजि. विनोद पाटील यांचा ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्काराने सन्मान जलसंपदा प्रकल्पांमधील उल्लेखनीय कार्याची दखल; जळगावातील अभियंता दिन कार्यक्रमात मानाचा गौरव

जामनेर : प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथील सुपुत्र तथा महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंता इंजि. विनोद प्रकाश पाटील यांचा अभियंता दिनानिमित्त ‘भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या उत्कृष्ट अभियंता गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. जळगाव येथे १५ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
इंजि. विनोद पाटील यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून सन २००३ मध्ये बी.ई. (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जलसंपदा क्षेत्रात कार्य करण्यास सुरुवात केली. सन २००४ ते २००७ या कालावधीत त्यांनी जिल्हा परिषद, नाशिक येथे कनिष्ठ अभियंता म्हणून काम केले. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांची सहाय्यक अभियंता श्रेणी-२ म्हणून निवड झाली.
सन २००७ ते २०१० या कालावधीत त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात कार्य केले. त्यानंतर महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक येथे प्रशिक्षण पूर्ण केले. सन २०११ ते २०१५ दरम्यान धुळे पाटबंधारे विभागांतर्गत जामखेडी मध्यम प्रकल्प, ता. साक्री येथे सहाय्यक अभियंता म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.
सन २०१५ ते २०२३ या कालावधीत वाघूर धरण प्रकल्प, जळगाव येथे त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. वाघूर उपसा योजनेअंतर्गत जळगाव, जामनेर व गारखेडा शाखेतील गुरुत्वीय नलिकेद्वारे वितरण प्रणाली, तसेच गाडेगाव व हिवरखेडा येथील पंपहाऊसच्या कामांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देणे, वितरण प्रणालीची कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करणे, प्रत्यक्ष क्षेत्रीय भेटी देऊन कामांवर लक्ष ठेवणे तसेच विविध तांत्रिक अडचणींवर मार्ग काढणे, या कार्याची विशेष दखल पुरस्काराच्या गौरवपत्रात घेण्यात आली आहे.
तसेच ‘१०० कोटी वृक्ष लागवड अभियान’ मध्ये सक्रिय सहभाग घेत शेतकऱ्यांमध्ये पाण्याबाबत जनजागृती करणे आणि शेती उत्पादन वाढीसाठी वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचे कामही त्यांनी केले आहे.
सन २०२३ मध्ये कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर ते सध्या गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव येथे कार्यरत आहेत.
सायकलिंग आणि ट्रेकिंगचीही आवड
अभियांत्रिकी क्षेत्रातील कार्यासोबतच इंजि. विनोद पाटील यांना सायकलिंग व ट्रेकिंगची विशेष आवड आहे. सन २०२१ मध्ये त्यांनी २००, ३००, ४०० आणि ६०० किलोमीटरचे बी.आर.एम. पूर्ण करून ‘सुपर रॅंडोनिअर्स’ हा किताब मिळविला आहे.
३०० विद्यार्थ्यांना दिले मार्गदर्शन
सन २०२१ ते २०२५ या कालावधीत त्यांनी अभियांत्रिकीच्या सुमारे ३०० विद्यार्थ्यांना इंटर्नशिप प्रशिक्षण दिले. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी वर्ग-१ व वर्ग-२ अधिकारी म्हणून शासन सेवेत दाखल झाल्याचे गौरवपत्रात नमूद करण्यात आले आहे.
जलसंपदा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, शेतकऱ्यांसाठी केलेले प्रयत्न, विद्यार्थ्यांना दिलेले मार्गदर्शन आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत जळगाव जिल्हा शासकीय अभियंता सहकारी पतपेढी मर्यादित, जळगाव यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जामनेर तालुक्यातील हिवरखेडा गावच्या सुपुत्राचा ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्काराने झालेला सन्मान हा संपूर्ण जामनेर तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली असून, त्यांच्या या गौरवाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

error: Don't Try To Copy !!