शेंदुर्णी (ता. जामनेर | जि. जळगाव) –
कलर्स मराठीवरील बहुचर्चित रिअॅलिटी शो ‘बिगबॉस मराठी – सिझन ६’ मध्ये खान्देशच्या मातीतून घडलेल्या एका कलाकाराने थेट महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या मनोरंजन मंचावर झेप घेत इतिहास रचला आहे. अहिराणी भाषेला राज्यभर ओळख मिळवून देणारे खान्देशचा आवाज – सचिन विठ्ठल कुमावत यांनी काल (११ जानेवारी) भव्य उद्घाटन सोहळ्यात बिगबॉसच्या घरात प्रवेश करत संपूर्ण खान्देशचा अभिमान वाढवला.
अभिनेता रितेश देशमुख यांच्या होस्टिंगमध्ये सुरू झालेल्या या सिझनच्या पहिल्याच दिवशी सचिन कुमावत यांच्या दमदार आणि आत्मविश्वासपूर्ण एन्ट्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ग्रामीण भागातून आलेला कलाकार अहिराणी भाषेचा अभिमान जपत मंचावर उभा राहिल्याने सोशल मीडियावरही त्यांच्या एन्ट्रीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेंदुर्णीसारख्या ग्रामीण भागातून कोणतेही राजकीय किंवा कौटुंबिक पाठबळ नसताना स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे सचिन कुमावत आजही आपल्या गावाशी, मित्रपरिवाराशी घट्ट नाळ जपून आहेत. साधेपणा आणि मातीशी नातं टिकवून ठेवणं हीच त्यांची ओळख आहे.
सन २००५ मध्ये ‘आरं दाजीबा’ या पहिल्या अल्बमपासून संगीत प्रवासाला सुरुवात करणाऱ्या सचिन कुमावत यांनी गेल्या दोन दशकांत खान्देशी लोककलेला आधुनिक व्यासपीठावर नेले. ‘केसांवर फुगे’, ‘लगनमा मचाडू धूम’, ‘सावन महिना मा’, ‘पोरी तुना गजरा’, ‘वाडी वाडी चंदन वाडी’, ‘टमटम’, ‘मनी डार्लिंग’, ‘मामी तुमची मुलगी लय सुंदर’, ‘खान्देशनी जत्रा’ यांसारखी असंख्य गाणी सुपरहिट ठरली आहेत.
विशेष म्हणजे ‘केसांवर फुगे’ या गाण्याने यूट्यूबवर २८७ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळवत अहिराणी–मराठी संगीत क्षेत्रात नवा इतिहास रचला. आज त्यांच्या यूट्यूब चॅनेलला एकूण १.२ बिलियनहून अधिक (१२० कोटींपेक्षा जास्त) व्ह्यूज मिळाले असून, ग्रामीण भागातून एवढे मोठे डिजिटल यश मिळवणारा ते पहिले खान्देशी कलाकार ठरले आहेत.
आतापर्यंत २५० पेक्षा अधिक लाईव्ह स्टेज शो, ५०० हून अधिक खान्देशी-अहिराणी व्हिडीओ अल्बम, तसेच Music Marathi, 9X Marathi, मायबोली यांसारख्या वाहिन्यांवर सातत्याने सादरीकरण असा त्यांचा कलात्मक प्रवास थेट बिगबॉसच्या घरापर्यंत पोहोचला आहे. याशिवाय लवकरच प्रदर्शित होणारा “ज्याची करावी कीव तोच घेतो जीव” हा त्यांचा आगामी चित्रपटही प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत आहे.
खान्देश भूषण, गिरणा गौरव, गोदा सन्मान, महाराष्ट्राचा Reel Star Award यांसारख्या अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या सचिन कुमावत यांच्या कारकिर्दीत बिगबॉस मराठी हे आणखी एक सुवर्णपान जोडले गेले आहे.
सचिन कुमावत यांची ही एन्ट्री केवळ एका कलाकाराचे यश नसून, संपूर्ण खान्देश आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रतिभेचा विजय असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
