जामनेर, दि. १४ मार्च २०२६ – मा. उच्च न्यायालय मुंबई तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन जामनेर येथे करण्यात आले. तालुका विधी सेवा समिती जामनेर तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालय जामनेर यांच्या वतीने या लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.
या लोकन्यायालयात मोठ्या प्रमाणावर पक्षकारांनी उपस्थिती दर्शविली. तहसील कार्यालय, महसूल विभाग, राष्ट्रीयकृत बँका, खाजगी पतसंस्था/बँका, बीएसएनएल, नगरपालिका, नगरपरिषद, महावितरण तसेच जामनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला.
सदर लोकन्यायालयात वादपूर्व प्रकरणे तसेच न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. वादपूर्व प्रकरणांपैकी ३०४ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यामध्ये २,०४,३६० रुपये इतक्या रकमेची तडजोड करण्यात आली.
तसेच न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण ५६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. दिवाणी व फौजदारी तडजोडयोग्य प्रकरणांमध्ये ९०,८०० रुपये इतक्या रकमेची तडजोड करण्यात आली.
वादपूर्व व न्यायालयीन प्रलंबित अशी मिळून एकूण ३६० प्रकरणे निकाली काढण्यात आली असून दोन्ही प्रकारच्या प्रकरणांमध्ये मिळून २,०५,३७,८८७ रुपये इतक्या रकमेची तडजोड करण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

