जामनेर |प्रतिनिधी
लहान भाऊ समीरने रोखण्याचा प्रयत्न केला असता दारूड्या मोहनने त्यालाही शिवीगाळ करत चाकूने मारण्याची धमकी दिली, ज्यामुळे वातावरण तापले.
दारूसाठी झालेल्या वादातून भावानेच केलेल्या सख्ख्या भावाच्या हत्येची थरारक घटना समोर आली आहे. दारूच्या व्यसनामुळे घरात सतत गोंधळ घालणाऱ्या 21 वर्षीय मोहन चिंताराम बांते या तरुणावर त्याच्याच लहान भावाने चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोहनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या काही तासांत आरोपी लहान भाऊ समीर चिंताराम बांते (वय 19 वर्षे) याला अटक केली आहे. नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिनीमातानगर भागात ही घटना घडली.आईकडे पैशांची मागणी अन् घरातील सामानाची नासधूस
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मोहनला दारूचे प्रचंड व्यसन होते. तो काहीही कामधंदा करत नव्हता. दारूसाठी तो रोज आई-वडिलांकडे पैशांसाठी तगादा लावत असे. बुधवारी रात्री 9 च्या सुमारास मोहन दारूच्या नशेत घरी आला आणि त्याने आईकडे पुन्हा पैशांची मागणी सुरू केली. पैसे देण्यास नकार मिळताच त्याने आई-वडिलांना अश्लील शिवीगाळ करत घरातील वस्तूंची तोडफोड सुरू केली. तसेच, वस्तू घराबाहेर फेकण्यासही सुरुवात केली. लहान भाऊ समीरने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता मोहनने त्यालाही शिवीगाळ करत चाकूने मारण्याची धमकी दिली, ज्यामुळे वातावरण तापले.संतप्त समीरकडून चाकूने वार; पोलिसात गुन्हा दाखल
थोरल्या भावाच्या रोजच्या त्रासाला आणि धमकीला कंटाळलेल्या समीरने संतापाच्या भरात चाकू घेऊन येत मोहनवर हल्ला चढवला. या हल्ल्यात मोहनच्या मान, पाठ, पोट आणि हातावर गंभीर जखमा झाल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोहनला नातेवाईकांनी शेजाऱ्यांच्या मदतीने तातडीने मेयो दाखल केले. डॉक्टरांनी रुग्णालयात उपचारादरम्यान 3 ते 4 तासांतच त्याला मृत घोषित केले. कळमना पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली हत्येचा गुन्हा दाखल करून समीरला अटक केली असून हल्ल्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे.




