सामरोद | प्रतिनिधी
सामरोद येथील जिल्हा परिषद शाळेत ‘शाळा स्वच्छता अभियान’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या अभियानात ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेत श्रमदान केले.
या वेळी शाळेच्या परिसरातील क्रीडांगण व बागेची स्वच्छता करण्यात आली. परिसरातील कचरा गोळा करून त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले. विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत शिक्षकांनी आरोग्य व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात सरपंच व पोलीस पाटील यांनी ‘स्वच्छ शाळा, समृद्ध गाव’ या संकल्पनेवर मार्गदर्शन केले. शाळा हे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचे केंद्र असून शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर राहिल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्यासोबतच अभ्यासातील एकाग्रताही वाढते, असे त्यांनी सांगितले.
गावकरी, लोकप्रतिनिधी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन श्रमदान केल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वच्छतेचा संदेश दिला.
अभियानाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकवृंदाने अभियानात सहभागी झालेल्या सर्व ग्रामस्थ, सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत सदस्यांचे आभार मानले.







