सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जामनेर पोलिसांची धडक कारवाई

५ ठिकाणी छापे; ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

जामनेर : सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जामनेर पोलिसांनी अवैध गावठी हातभट्टी दारूविरोधात धडक कारवाई केली. दिनांक १७ व १८ सप्टेंबर २०२६ रोजी जामनेर पोलीस स्टेशनच्या पथकाने गारखेडा, शहापूर व सामरोद परिसरात एकूण पाच ठिकाणी छापे टाकून तब्बल ८७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे सुमारे १ हजार ६०० लिटर गूळ व नवसागर मिश्रित कच्चे रसायन पोलिसांनी जप्त केले. सदर कच्च्या रसायनाला आंबट व उग्र वास असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. तसेच ४५ लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू देखील जप्त करण्यात आली.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ८७ हजार ५०० रुपये असल्याची माहिती जामनेर पोलिसांनी दिली. जप्त केलेला मुद्देमाल नियमानुसार नष्ट करण्यात आला आहे.

सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू निर्मिती व विक्रीला आळा घालण्यासाठी जामनेर पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या कारवाईमुळे अवैध हातभट्टी व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनमध्ये पाच आरोपींविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

दरम्यान, सण-उत्सव काळात शांतता व कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी अवैध दारू, जुगार तसेच इतर बेकायदेशीर प्रकारांविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

error: Don't Try To Copy !!