खरीप हंगाम २०२६ नियोजनासाठी कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक


जळगाव, दि. ८ एप्रिल —(प्रतिनिधी)आगामी खरीप हंगाम २०२६च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांचा वेळेवर व पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यासाठी मागणीपेक्षा अधिक खत पुरवठ्याचा कोटा कृषी आयुक्तालयाकडून मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली. कृषी विकास अधिकारी श्री. पद्मनाभ म्हस्के यांनी खत पुरवठा व वितरणाचे सविस्तर नियोजन सादर केले.


शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता खतांची अनावश्यक साठवणूक टाळावी तसेच जमिनीच्या आरोग्यपत्रिकेनुसार व पिकांच्या गरजेनुसारच खत खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
खत विक्रेत्यांना आधार संलग्न (e-POS) प्रणालीद्वारेच विक्री करणे आणि अचूक बिलिंग ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. साठेबाजी किंवा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
बैठकीत कृषी विभाग, पोलीस प्रशासन, रेल्वे विभाग, वाहतूकदार व शेतकरी संघटनांमध्ये समन्वय राखून खत पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात आला.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. कुरबान तडवी, कृषी विकास अधिकारी श्री. पद्मनाभ म्हस्के, मोहीम अधिकारी श्री. अविनाश खैरनार, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री. विकास बोरसे यांच्यासह पोलीस अधिकारी, खत कंपन्यांचे प्रतिनिधी, रेल्वे अधिकारी व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
“खरीप हंगामात शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासन सज्ज असून खत साठा पुरेसा आहे. पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त निविष्ठा वितरणाला आमचे प्राधान्य आहे,” असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

error: Don't Try To Copy !!