खरीप हंगाम २०२६साठी जळगावात युरिया खतांची पहिली रेक दाखल
जळगाव, दि. ८ एप्रिल —(प्रतिनिधी ) खरीप हंगाम २०२६च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खतांचा वेळेवर व पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, आज युरिया खतांची पहिली रेक जिल्ह्यात दाखल झाली.
या रेकद्वारे सुमारे २६५० मेट्रिक टन युरिया खत जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहे. सदर खत पुरवठा Rashtriya Chemicals & Fertilizers (RCF) कंपनीमार्फत करण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन खत साठ्याची पाहणी केली तसेच कंपनी प्रतिनिधी, वाहतूकदार व हमाल प्रतिनिधींशी संवाद साधून उतरवणूक आणि वितरण प्रक्रियेचा आढावा घेतला.
खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहेत. खतांची विक्री आधार संलग्न (e-POS) प्रणालीद्वारेच करण्याचे आदेश देण्यात आले असून, साठवणूक, वाहतूक व विक्री प्रक्रियेत कोणतीही अनियमितता होऊ नये यासाठी यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना
देण्यात आल्या आहेत.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेत, रास्त दरात आणि आवश्यक प्रमाणात खत उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा प्रशासनाने खतांचा तुटवडा भासू नये यासाठी सातत्याने नियोजन व पाठपुरावा सुरू ठेवला असून, या उपक्रमामुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला बळकटी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
“शेतकऱ्यांची सोय आणि कृषी निविष्ठांची वेळेवर उपलब्धता ही प्रशासनाची प्राथमिकता आहे. खत विक्रीत पारदर्शकता राखण्यासाठी तांत्रिक प्रणालीचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,” असे जिल्हा प्रशासनाने नमूद केले.
