समता व सामाजिक एकात्मतेचा आदर्श; जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष विवाह नोंदणी संपन्न


जळगाव, दि. ९ एप्रिल — (प्रतिनिधी ) समाजातील भेदभाव दूर करून सर्वसमावेशकतेला चालना देणाऱ्या ‘दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजने’च्या उद्दिष्टांना अधोरेखित करणारा एक आदर्श विवाह सोहळा आज जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे पार पडला.
तांदलवाडी (ता. रावेर) येथील श्री. महेंद्र श्रीराम पाटील (दिव्यांग) आणि श्रीमती दमयंती दिनकर कुंवर (अव्यंग) यांनी नोंदणी पद्धतीने विवाह करून सामाजिक समता, परस्पर स्वीकार आणि एकात्मतेचा संदेश दिला. या विवाहामुळे समाजासमोर एक सकारात्मक व प्रेरणादायी उदाहरण उभे राहिले आहे.


या प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी नवदांपत्याची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या उज्ज्वल, सुखमय वैवाहिक जीवनासाठी मंगलकामना व्यक्त केल्या. दिव्यांग व सुदृढ व्यक्तींच्या अशा विवाहांमुळे सामाजिक समतोल राखण्यास मदत होत असून दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणाला बळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या धोरणानुसार अशा दांपत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. सामाजिक रूढींना छेद देणारा हा विवाह ‘समावेशक समाजा’कडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.


“विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा मिलाफ नसून तो सामाजिक बदलाचा एक महत्त्वाचा घटक आहे. महेंद्र आणि दमयंती यांनी स्वीकारलेला हा मार्ग इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल,” असे मत जिल्हा प्रशासनाने व्यक्त केले.

error: Don't Try To Copy !!