पहूर, ता. जामनेर :
पहूर कसबे ग्रामपंचायत कार्यालयातील आजची ग्रामसभा संतापाच्या वातावरणात पार पडली. तब्बल दहा महिने उलटूनही माजी ग्रामविकास अधिकाऱ्याने दप्तर सुपूर्द केले नाही, या गंभीर प्रकारावरून ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला जाब विचारला.
माजी प्रशासक रामचंद्र वानखेडे यांनी थेट सवाल करत प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जनतेला वेठीस धरून नेमकं कोणाचं रक्षण केलं जातंय?” असा त्यांचा संतप्त सवाल सभागृहात चर्चेचा विषय ठरला.
गुरुवारी (ता. ७) सकाळी ९ वाजता प्रशासक सौ. आशाताई शंकर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. या वेळी विद्यमान ग्रामविकास अधिकारी शिवदास गव्हाळे यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले की,
माजी ग्रामविकास अधिकारी अशोक बाविस्कर यांनी केवळ चालू वर्षाचा चार्ज दिला असून, मागील कार्यकाळातील दप्तर अद्याप त्यांच्याच ताब्यात आहे.
या प्रकारामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. सार्वजनिक कार्यालयाचे दप्तरच उपलब्ध नसेल, तर जनतेला माहिती वेळेत कशी मिळणार ? असा सवाल उपस्थित करण्यात आला.
दरम्यान तत्कालीन ग्रामविकास अधिकारी अशोक बाविस्कर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की सदर दप्तर हे ग्रामपंचायत कार्यालयातच आहे, शासकीय दप्तर मी घरी कशाला घेऊन येऊ? असा प्रश्न करून त्यांनी दप्तर ग्रामपंचायत मध्येच शोधण्याचा सल्ला दिला.
माहिती अधिकारालाही अडथळा
दप्तर उपलब्ध नसल्यामुळे माहिती अधिकाराखाली मागविलेली माहिती वेळेत देता येत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, संबंधितांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
पार्टटाईम अधिकाऱ्यांमुळे कारभारावर परिणाम
पहूर कसबे सारख्या मोठ्या गावासाठी पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नसणे ही गंभीर बाब असल्याचे ग्रामस्थांनी मांडले. विद्यमान अधिकारी शिवदास गव्हाळे यांच्याकडे रांजणी गावाचाही कार्यभार असल्याने स्थानिक समस्या दुर्लक्षित होत असल्याची तक्रार करण्यात आली. पहूरसाठी कायमस्वरूपी अधिकारी नेमण्याची मागणी करण्यात आली.
ग्रामस्थांनी मांडल्या विविध समस्या
ग्रामसभेत नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. वाघूर धरणाची पाणी योजना अद्याप सुरू न होणे याविषयी मधुकर पवार अशोक जाधव यांनी आवाज उठविला .स्मशानभूमी व गावातील रस्त्यांची दुरवस्था, वैकुंठ रथ व शववाहिकेची गरज, शेंदुर्णी मार्गावरील दिव्यांची अनियमितता, जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सवलत देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते ईश्वर हिवाळे यांनी केली . गट क्रमांक १३५८ अतिक्रमण हटविण्याची तीव्र मागणी माजी उपसरपंच युसूफ बाबा यांनी करून पोलीस बंदोबस्तात कारवाई करावी अन्यथा आंदोलन छडण्याचा इशारा देखील त्यांनी दिला .श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर परिसरातील पर्यटन विभागाअंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांमध्ये ठेकेदारांची मनमानी व दडपशाही याविषयी विश्वस्त किशोर बनकर व अशोक जाधव यांनी आवाज उठवला .
ग्रामसभेच्या प्रारंभी प्रगणक शंकर भामेरे यांनी नागरिकांना स्वगणनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. सभेला आजी-माजी पदाधिकारी, प्रशासकीय समिती सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
एकूणच, दप्तर न सुपूर्द करण्याच्या प्रकारामुळे पहूर कसबे ग्रामपंचायतीतील प्रशासनाचा कारभार चर्चेत आला असून, आता या प्रकरणात ठोस कारवाई होते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
