जळगाव : अतिवृष्टी अनुदान वेळेत न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे धाव घेत अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांना निवेदन सादर केले. लवकरात लवकर निधी न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला.
अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर निधी वर्ग करण्यात येईल असे आश्वासन दिले.
याशिवाय शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महसूल अधिकारी अंगद कासटकर यांचीही भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. कासटकर यांनी जामनेर तहसीलदारांशी तत्काळ दूरध्वनीवरून चर्चा केली आणि येत्या आठ दिवसांत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट निधी वर्ग करण्यात येईल असे स्पष्ट केले.
या आंदोलनात सुभाष ठोंबरे, अविनाश पाटील, गोपाल कदम, समाधान चौधरी, प्रकाश ठोंबरे, अशोक ढगे, रामचंद्र पवार, अजय मराठे आणि विशाल भगत यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
