जळगाव, दि. 15 जून : भुसावळ येथील सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संबंधित एका प्रकरणात सहकार अधिकारी व दोन लेखापरीक्षकांना 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी भुसावळ शहरात करण्यात आली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला सावकारी व्यवसायासाठी आवश्यक परवाना काढायचा होता. त्यासाठी संबंधित कार्यालयात अर्ज केल्यानंतर परवाना मंजूर करून देण्यासाठी
सहकार अधिकारी विजय विनायक गारूड (वर्ग-3) यांनी 20 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती.तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. तपासादरम्यान सुरेश जनार्दन विसपुते आणि हेमंत प्रकाश काळे या प्रमाणित लेखापरीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांसाठी व स्वतःसाठी मिळून 30 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.सोमवारी भुसावळ शहरातील नाहाटा चौफुली परिसरात सापळा कारवाईदरम्यान सुरेश विसपुते यांनी

तक्रारदाराकडून 30 हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर एसीबीने त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी विजय गारूड, सुरेश विसपुते आणि हेमंत काळे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.
