जामनेर, ता.२२ (प्रतिनिधी) जामनेर शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनबर्डी परिसरातील एका निर्जनस्थळी माजी सभापती सुनंदाबाई पाटील यांचे पती प्रल्हाद पाटील (वय ६२, रा. मोयखेडा, ता. जामनेर) यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली असून, मयत प्रल्हाद पाटील यांच्या खिशात काही चिठ्ठ्या सापडल्याची प्राथमिक माहिती मिळत असल्याने आत्महत्येमागील गूढ वाढले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोयखेडा येथील रहिवासी असलेले प्रल्हाद पाटील यांनी आज संध्याकाळी सोनबर्डी परिसराच्या मागील बाजूस असलेल्या एका निर्जनस्थळी झाडाला गळफास
लावून आपले जीवन संपवले. प्रल्हाद पाटील हे व्यवसायाने शिक्षक होते आणि त्यांनी २०२१ साली स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्याच सुमारास त्यांच्या पत्नी सुनंदाबाई पाटील जामनेर पंचायत समितीच्या सभापती म्हणून कार्यरत होत्या.
घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्रल्हाद पाटील यांनी आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठ्यांमुळे आत्महत्येमागे काही कारण असावे असा पोलिसांना संशय आहे. जामनेर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
प्रल्हाद पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून आणि तीन नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येने मोयखेडा आणि जामनेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
