जामनेर (प्रतिनिधी) :
जामनेर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक प्रकाश पाटील यांच्या मातोश्री निवासस्थानी पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा गट) आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आगामी नगरपालिका निवडणूक एकत्रितपणे, महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला.
या बैठकीस शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख श्री. योगीराज पाटील, जिल्हा संघटक अशोकभाऊ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपभाऊ खोडपे, डिके दादा पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किशोर पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख ॲड. प्रकाश पाटील, उपतालुकाप्रमुख सुधाकर शेठ सराफ, शहरप्रमुख निशामुद्दीन शेठ, नानाभाऊ जंजाळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष एस. टी. पाटील, सौ. ज्योत्स्ना विसपुते, ॲड. चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत सर्व पक्षांनी एकजुटीने काम करण्याचा आणि जामनेर नगरपालिकेत सत्ता प्रस्थापित करण्याचा निर्धार व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत जामनेरमधील राजकीय समीकरणांमध्ये चुरस वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
