धुळे : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा परिसरात आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील स्टेटसच्या कारणावरून दोन गट आमनेसामने आले. वाद वाढल्यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक झाल्याचे समोर आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे.
घटनेनंतर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून, परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक ती कारवाई सुरू आहे. सोशल मीडियावरील अफवा किंवा आक्षेपार्ह पोस्टमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या प्रकरणात नेमके किती जण जखमी झाले आणि किती जणांवर कारवाई झाली, याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.




