पाळधी, दि. ५ सप्टेंबर : जामनेर तालुक्यातील पाळधी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत एक दिवसासाठी अध्यापनाची धुरा सांभाळली. चिमुकल्यांच्या हाती खडू आणि वर्गात ‘गुरुजी’ अशी आगळीवेगळी अनुभूती विद्यार्थ्यांसह शिक्षकांना मिळाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेतून विविध विषयांचे अध्यापन केले. शिक्षक म्हणून वर्गासमोर उभे राहण्याचा अनुभव घेताना विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि वक्तृत्वकौशल्य विकसित झाले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक किरण सपकाळे, शिक्षक अमित मुंडे, जितेंद्र नाईक, सतीश बावस्कर, रविंद्र क्षिरसागर, वाघ सर, तसेच सौ. जाधव, सौ. नंदा आपर, सौ. ज्योती पाटील, सौ. सुतार आणि सौ. वाघुळदे यांचा शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने महाराष्ट्रीयन संस्कृतीनुसार रुमाल, टोपी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर चोरडिया यांनी केले, तर आभार प्रदर्शन शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपाल वाणी, उपाध्यक्ष संदीप पाटील, प्रवीण माळी, विनोद शिंदे, सौ. शीतल शिंदे तसेच इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.








