यावल : यावल शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या महत्त्वाकांक्षी कामाला अखेर सुरुवात झाली आहे. गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावरील सुमारे ६ किलोमीटरच्या रस्त्याच्या कामासाठी तब्बल १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यावल शहरातील भुसावळ टी-पॉईंट परिसरात आयोजित कार्यक्रमात या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केंद्रीय बाल कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
शहरातून जाणाऱ्या या मार्गावर वाहतुकीची वाढती वर्दळ लक्षात घेता चौपदरीकरणाची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. या कामामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच वाहनचालकांना अधिक सुरक्षित आणि सुकर प्रवास करता येणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या रस्त्याच्या कामासाठी नागरिक आणि स्थानिकांकडूनही सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने यावल परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भूमिपूजन कार्यक्रमाला यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंग राजपूत, उपसभापती दीपक चौधरी, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी हिरालाल चौधरी, कुऱ्हा येथील माजी सभापती हर्षल पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य आर. जी. पाटील (नाना), माजी जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती रविंद्र पाटील, भाजप यावल मंडळ अध्यक्ष सागर कोळी, किनगाव मंडळ अध्यक्ष अनिल पाटील यांच्यासह यावल नगरपालिकेच्या गटनेत्या नंदाताई महाजन, नगरसेविका कल्पना वाणी, वर्षा येवले, नयनवर तसेच कुऱ्हा येथील संचालिका कांचन फालक आणि विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर यावल शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, परिसराच्या विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.




