यावल : शहरालगतच्या खडकाई नदीपात्र परिसरात प्रोसोपिस बाभळीच्या झुडपांमध्ये लपवून ठेवण्यात आलेले सागवान लाकूड वनविभागाच्या पथकाने कारवाई करून जप्त केले. या कारवाईत सागवानाचे सात नग आढळून आले.
वनविभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.२० वाजता गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने खडकाई नदीपात्र परिसरात पाहणी केली. यावेळी बाभळीच्या झुडपांमध्ये लपवून ठेवलेले सागवान लाकूड निदर्शनास आले.
पंचांच्या उपस्थितीत केलेल्या पाहणीत सागवानाचे ७ नग, एकूण ०.१९२ घनमीटर घनफळाचे लाकूड आढळून आले. त्याची अंदाजे नुकसान किंमत ३,६३३ रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
वनविभागाने पंचनामा करून सदर सागवान कटसाईजचा माल जप्त केला. जप्त केलेला माल शासकीय वाहनाद्वारे मुख्य विक्री केंद्र, यावल येथे ताबा पावतीद्वारे जमा करण्यात आला.
या प्रकरणी वनगुन्हा क्र. १९/२०२६, दिनांक ०३/०९/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली असून, पुढील आवश्यक पंचनामा व जबाब नोंदविण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.








