5 किलो 352 ग्रॅम गांजा जप्त; शिंगाईत परिसरातील संशयिताविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा
जामनेर : प्रतिनिधी JBN NEWS
जामनेर पोलिसांनी अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात मोठी कारवाई करत 5 किलो 352 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत 2 लाख 94 हजार 360 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई 14 सप्टेंबर 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर पोलीस ठाण्याच्या पथकाला शिंगाईत शिवारात गांजाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून जामनेर–भुसावळ रोडवरील सुशीला एजन्सीजवळील रामा हॉटेल परिसरात कारवाई केली.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी हिरवट-तपकिरी रंगाचा पाने, फुले व बिया असलेला 5 किलो 352 ग्रॅम गांजा जप्त केला. या गांजाची बाजारातील किंमत 2,94,360 रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात भगवान हिरामन सूर्यवंशी, रा. शिंगाईत, ता. जामनेर याच्या ताब्यातून गांजा मिळून आल्याचे पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये नमूद आहे. पोलिसांची चाहूल लागताच संशयिताने अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचेही पोलिसांनी सांगितले. संबंधित व्यक्ती गांजा स्वतःच्या ताब्यात ठेवून ग्राहकांना नशेसाठी विक्री करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध NDPS कायदा 1985 मधील कलम 8(C) व 20(B) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची मोठी किंमत लक्षात घेता जामनेर पोलिसांची ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे, स.पो.नि. स्वप्निल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे, पोहेकॉ/358 उमेश चौधरी, पोको/2103 सचिन महाजन, पोको/1730 योगेश पाटील, पोको/3235 विशाल लाड आणि पोको/2295 अनमोल पाटील यांच्या पथकाने सहभाग घेतला.
जामनेर पोलिसांच्या या कारवाईमुळे शहर व परिसरातील अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी काळातही अवैध धंदे व अमली पदार्थांच्या विक्रीविरोधातील कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

