भक्तिमय वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप; पोलिसांचा चोख बंदोबस्त
जामनेर : शहरासह तालुक्यात पाच दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात विराजमान झालेल्या गणरायाला आज भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. विविध गणेश मंडळे तसेच घरगुती गणपतींचे विसर्जन शांततेत आणि उत्साहात पार पडले.
गणेशोत्सवादरम्यान शहरातील विविध भागांमध्ये गणेश मंडळांकडून धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आरती, भजन, कीर्तन तसेच विविध उपक्रमांमुळे गेल्या पाच दिवसांपासून जामनेर शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
आज गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांवर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. ढोल-ताशांच्या गजरात, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गणरायाला निरोप देण्यात आला. अनेक भाविकांनी पारंपरिक पद्धतीने मिरवणुका काढून बाप्पाचे विसर्जन केले.
गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी जामनेर पोलिसांकडून शहरातील प्रमुख चौक, विसर्जन मार्ग आणि गर्दीच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठीही आवश्यक नियोजन करण्यात आले होते.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पाचही दिवसांत नागरिकांनी शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवत उत्सव साजरा केला. प्रशासन, पोलीस यंत्रणा, गणेश मंडळांचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे जामनेरमध्ये पाच दिवसांचा गणेशोत्सव शांततेत पार पडला.
शहरात पाच दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात विराजमान झालेल्या गणरायाला आज भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. शहरातील रुबी स्टार हॉस्पिटल, जामनेर बसस्थानक, प्रकाशचंद जैन फार्मसी कॉलेज यांसह विविध ठिकाणी गणेश विसर्जनाचा कार्यक्रम शांततेत पार पडला.
‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत गणरायाला भावपूर्ण निरोप देताना अनेक भाविकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.




