मारहाण करून फरफटत नेल्याचा नातेवाईकांचा संशय; सखोल चौकशीची मागणी
जामनेर | सोमवार, २१ सप्टेंबर | जेबीएन महाराष्ट्र न्यूज
जामनेर शहरातील शास्त्रीनगर परिसरात २८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. २० सप्टेंबर) घडली. बबलू देविदास वाणी असे मृत तरुणाचे नाव आहे. त्यांना मारहाण करून फरफटत नेण्यात आले असावे, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी बबलू वाणी यांना जखमी अवस्थेत रिक्षातून जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणून दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव येथे हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
मृत्यूनंतर बबलू वाणी यांचा मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. दरम्यान, मृताच्या पायावर तसेच उजव्या पृष्ठभागावर फरफटत नेल्यासारख्या जखमा आढळून आल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा मृत्यू संशयास्पद असून, बबलू यांना मारहाण झाली असावी, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, जखमी बबलू वाणी यांना रुग्णालयात घेऊन आलेले व्यक्ती कोण होते, रिक्षा कोणाची होती, त्यांना नेमके कुठून आणण्यात आले आणि त्यावेळी परिस्थिती काय होती, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या सर्व बाबींची पोलिसांनी सखोल चौकशी करून घटनेमागील नेमके सत्य समोर आणावे, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.
या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेमागील परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
बबलू वाणी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अचानक व संशयास्पद मृत्यूमुळे कुटुंबीयांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, या प्रकरणातील नेमके सत्य पोलिसांच्या तपासातून समोर येण्याची प्रतीक्षा आहे.
