ज्ञानगंगा विद्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

‘निरोगी उद्यासाठी आयुर्वेद’ विषयावरील निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

जामनेर : जामनेर येथील ज्ञानगंगा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘निरोगी उद्यासाठी आयुर्वेद’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन यांच्या शुभहस्ते माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष डॉ. प्रशांत बोंडे, श्री. के. बी. माळी, विद्यालयाचे प्राचार्य श्री. राजेंद्र सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, उपजिल्हा रुग्णालय जामनेरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल चांदा, तसेच डॉ. जितेंद्र वानखेडे, डॉ. चंद्रमणी सुरवाडे, डॉ. धनंजय पाटील, डॉ. निलेश चव्हाण, डॉ. पंकज पाटील, अमोल सोनवणे, सलमा तडवी, मोनाली सावळे, हर्षा गवळे, अनिता बडगुजर यांच्यासह आर.बी.एस.के. पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सेवा संकल्प अभियानांतर्गत सदर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका वैद्यकीय अधिकारी, जामनेर यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.

इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी निबंध व वक्तृत्व स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ‘निरोगी उद्यासाठी आयुर्वेद’ या विषयावर विद्यार्थ्यांनी आयुर्वेदाचे महत्त्व, निरोगी जीवनशैली, पारंपरिक उपचारपद्धती आणि आरोग्य संवर्धन याबाबत आपले विचार प्रभावीपणे मांडले.

स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे आणि आरोग्यविषयक जागरूकता वाढावी, या उद्देशाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विलास पाटील सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. विजय कोळी सर यांनी केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहण्यासोबतच आयुर्वेदाच्या महत्त्वाची माहिती मिळाली.

error: Don't Try To Copy !!