फार्मर आयडीचे अनधिकृत कार्ड छापणे व वाटप करणे चुकीचे; कृषी विभागाचा स्पष्ट इशारा

पुणे | प्रतिनिधी : अग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत शेतकरी नोंदणीसाठी तयार करण्यात येणाऱ्या डिजिटल Farmer ID बाबत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. शेतकऱ्यांचे Farmer ID कार्ड परवानगीशिवाय छापणे, त्याची प्रत तयार करणे किंवा वितरित करणे हा गंभीर प्रकार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

कृषी विभागाच्या २४ सप्टेंबर २०२५ रोजीच्या पत्रानुसार, भारत सरकारच्या अग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत शेतकरी नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात येत असून, त्यासाठी डिजिटल Farmer ID तयार करण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी CSC/सेवा केंद्रे तसेच संबंधित संस्थांकडून शेतकऱ्यांना Farmer ID चे भौतिक अथवा ऑफलाइन कार्ड देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्देशांचा हवाला देत कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की, अॅग्रीस्टॅक अंतर्गत कोणतेही भौतिक किंवा ऑफलाइन Farmer ID कार्ड अधिकृतपणे मान्य करण्यात आलेले नाही.

अनधिकृत कार्डपासून सावध राहण्याचे आवाहन

परवानगीशिवाय Farmer ID कार्ड तयार करणे, छापणे, वितरित करणे किंवा त्याची प्रत प्रसारित करणे यामुळे गैरवापराची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या अनधिकृत प्रक्रियांपासून शेतकऱ्यांनी सावध राहावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

या संदर्भात व्हॉट्सॲप संदेश, वृत्तपत्रे, दवंडी तसेच इतर स्थानिक माध्यमांतून व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांनी Farmer ID संदर्भात कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेकडून अनधिकृत छापील कार्ड अथवा त्याची प्रत स्वीकारण्यापूर्वी योग्य ती खात्री करावी. Farmer ID बाबत अधिकृत माहिती व प्रक्रियेसाठी संबंधित कृषी विभागाचे कार्यालय किंवा अधिकृत यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

— जे बी एन महाराष्ट्र न्यूज

error: Don't Try To Copy !!