किणगावात देशी बनावटीच्या पिस्तुलासह २५ वर्षीय तरुण ताब्यात

दोन जिवंत काडतुसे जप्त; यावल पोलिसांत आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल

यावल : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून गुन्हेगारांची तपासणी आणि गस्त वाढविण्यात आली आहे. याच कारवाईदरम्यान किणगाव येथे यावल पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या पथकाने एका २५ वर्षीय तरुणाला देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले.

ही कारवाई किणगाव गावात करण्यात आली. संशयित तरुणाकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करून त्याला यावल पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्याविरुद्ध आर्म्स ॲक्टच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आगामी सण-उत्सवांच्या काळात कोणताही गंभीर गुन्हा घडू नये, यासाठी यावल पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी, सखोल पेट्रोलिंग तसेच संशयित व्यक्ती आणि गुन्हेगारांची तपासणी करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित तसेच फैजपूरचे डीवायएसपी अनिल बळगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पिस्तूल व जिवंत काडतुसे आढळून आल्याने या कारवाईमुळे यावल तालुक्यात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

error: Don't Try To Copy !!