जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेर
प्रतिनिधी-सुपडू जाधव
डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या रंगकामावर तीव्र नाराजी; आरपीआयचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन, आंदोलनाचा इशारा
जामनेर शहरातील पोलीस स्टेशन समोर असलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या रंगकामामुळे बाबासाहेबांच्या सन्मानाला धक्का पोहोचल्याची भावना व्यक्त होत असून या प्रकाराबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)च्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात आज आरपीआयच्या वतीने जामनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पुतळ्याला करण्यात आलेले रंगकाम हे बाबासाहेबांच्या तेजस्वी व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत नसून त्यामुळे पुतळ्याचे विद्रूपीकरण झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे बाबासाहेबांच्या पुतळ्याला सोनेरी (गोल्डन) रंग देऊन योग्य प्रकारे सुशोभीकरण करण्यात यावे तसेच दोन दिवसांच्या आत पुतळ्याची संपूर्ण स्वच्छता करण्यात यावी, अशी ठाम मागणी आरपीआयने केली आहे.
प्रशासनाने या मागणीची तात्काळ दखल न घेतल्यास बाबासाहेबांच्या सन्मानासाठी आणि अनुयायांच्या भावना लक्षात घेता आरपीआयच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आरपीआयचे नेते भगवान सोनवणे यांनी दिला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक न्याय, समता आणि संविधानाचे शिल्पकार असल्याने त्यांच्या पुतळ्याबाबत कोणतीही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, अशी भूमिका आरपीआयच्या वतीने यावेळी ठामपणे मांडण्यात आली. प्रशासनाने त्वरित योग्य निर्णय घेऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याचे सन्मानपूर्वक सुशोभीकरण करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांतूनही होत आहे.
डॉ . बाबासाहेबांच्या रंगकामावर तीव्र नाराजी; आरपीआयचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन, आंदोलनाचा इशारा
