बोदवड | प्रतिनिधी
“आजचा युवक हा उद्याच्या भारताचा शिल्पकार आहे. मात्र तोच युवक अमली पदार्थांच्या विळख्यात सापडला तर केवळ त्याचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे भवितव्य अंधारात जाईल. व्यसन हे युवकांच्या स्वप्नांचे, कुटुंबाच्या सुखाचे आणि देशाच्या प्रगतीचे सर्वात मोठे शत्रू आहे,” असे परखड मत बोदवड न्यायालयाचे माननीय न्यायाधीश अतीश खोल्लम यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय युवा दिनानिमित्त कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बोदवड येथील राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) एककाच्या विशेष हिवाळी शिबिराअंतर्गत आयोजित “समर्थ युवक, समर्थ भारत” मॅरेथॉन व “अमली पदार्थ मुक्त भारत – अमली पदार्थ मुक्त तरुण” या
विषयावरील व्याख्यान कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
न्यायाधीश खोल्लम म्हणाले की, अमली पदार्थांचे सेवन सुरुवातीला मौज-मजेसाठी सुरू होते, मात्र पुढे त्याचे रूप गंभीर व्यसनात बदलते आणि शेवटी गुन्हेगारीकडे वाटचाल होते. न्यायालयात येणाऱ्या अनेक गुन्ह्यांची मुळे ही व्यसनाधीन तरुणांशी जोडलेली असतात. चोरी, मारहाण, फसवणूक यांसह गंभीर गुन्ह्यांमागे व्यसन हे प्रमुख कारण असल्याचे वास्तव त्यांनी अधोरेखित केले.
कायद्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करताना त्यांनी एन.डी.पी.एस. कायद्यानुसार अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांना अत्यंत कठोर शिक्षा, मोठा दंड व दीर्घकालीन कारावासाची तरतूद असल्याचे स्पष्ट केले. क्षणिक आकर्षण किंवा चुकीची संगत आयुष्य उद्ध्वस्त करू शकते, त्यामुळे युवकांनी सदैव व्यसनांपासून दूर राहावे, असा ठाम संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते बोदवड वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अर्जुन पाटील यांनी अमली पदार्थांचे मानसिक, शारीरिक व कौटुंबिक दुष्परिणाम स्पष्ट करत युवकांनी चुकीच्या संगतीपासून दूर राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. नितेश सावदेकर यांनी केले. त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांनुसार युवक हा परिवर्तनाचा प्रमुख घटक असल्याचे सांगत एन.एस.एस. ही समाजबदलाची चळवळ असल्याचे नमूद केले.
यावेळी आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत २३२ स्वयंसेवक व शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुलांच्या गटातून रिहान शेख प्रथम, विनायक भावसार द्वितीय तर जयदीप सरोदे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. मुलींच्या गटातून कु. आयेशा निजाम मुलतानी प्रथम, त्रिवेंद्र वाघ द्वितीय तर कु. लीना सांगवे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद चौधरी यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. शरद पाटील, तर आभार प्रदर्शन कु. उपासना पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. कंचन दमाडे, प्रा. अजित पाटील, प्रा. ज्ञानेश्वर तिवारी, प्रा. तुषार सोनवणे व सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

