जळगाव (प्रतिनिधी) – पहूर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून राजकारणात आलेल्या अरविंद देशमुख यांनी जळगाव शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा आपली छाप पाडली आहे. जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजय मिळवल्यानंतर आता सुमारे 2000 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्प असलेल्या महानगरपालिकेच्या स्थायी समितीवर त्यांची निवड झाली आहे.
महानगरपालिकेची स्थायी समिती ही आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शहरातील विकासकामे, विविध प्रकल्पांची मंजुरी, खर्चाचे नियोजन आणि आर्थिक धोरणांबाबतचे महत्त्वपूर्ण निर्णय या समितीत घेतले जातात. त्यामुळे देशमुख यांची या प्रभावी समितीत झालेली निवड जळगाव शहरासाठी आणि त्यांच्या
समर्थकांसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
अरविंद देशमुख यांची ओळख केवळ नगरसेवक म्हणून मर्यादित नसून ते महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू सहकारी व ‘संकटमोचक’ कार्यकर्ता म्हणूनही ओळखले जातात. जिल्ह्यातील विविध राजकीय घडामोडींमध्ये त्यांनी प्रभावी नियोजन व संघटन कौशल्य दाखवत नेतृत्वाला बळकटी दिली आहे.
स्थायी समितीतील त्यांच्या कामगिरीकडे आता जळगावकरांचे लक्ष लागले असून, शहराच्या विकासाला गती देण्यासाठी ते ठोस आणि परिणामकारक निर्णय घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
