जळगाव रेल्वे स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगचे काम; १२ गाड्या रद्द

१९ ते २४ सप्टेंबरदरम्यान रेल्वे वाहतुकीवर परिणाम; काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेतही बदल

जळगाव : जळगाव रेल्वे स्थानकावर जळगाव–भुसावळ पाचव्या मार्गिकेच्या कामाच्या अनुषंगाने यार्ड रिमॉडेलिंगचे महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे १९ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार असून, प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने काही गाड्या रद्द करण्यासह काही गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे.

यार्ड रिमॉडेलिंगच्या कामासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंगची कामे करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर २३ सप्टेंबर रोजी पाच तर २४ सप्टेंबर रोजी सात अशा एकूण १२ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

२३ सप्टेंबरला पाच गाड्या रद्द

२३ सप्टेंबर रोजी पुढील गाड्यांचे संचालन रद्द राहणार आहे :

• १९००७ सुरत–भुसावळ एक्स्प्रेस
• १९१०५ उधना–भुसावळ एक्स्प्रेस
• १९१०६ भुसावळ–उधना एक्स्प्रेस
• ११११४ भुसावळ–देवळाली मेमू
• ६११३० बडनेरा–नाशिक रोड मेमू

२४ सप्टेंबरला सात गाड्या रद्द

२४ सप्टेंबर रोजी पुढील सात गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत :

• १९००८ भुसावळ–सुरत एक्स्प्रेस
• ५९०७५ नंदुरबार–भुसावळ पॅसेंजर
• ५९०७६ भुसावळ–नंदुरबार पॅसेंजर
• ११११९ इगतपुरी–भुसावळ मेमू
• १११२० भुसावळ–इगतपुरी मेमू
• ११११३ देवळाली–भुसावळ मेमू
• ६११२९ नाशिक–बडनेरा मेमू

लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेतही बदल

या कामाचा परिणाम काही लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसवरही होणार आहे. २४ सप्टेंबर रोजी १२७८० हजरत निजामुद्दीन–वास्को द गामा एक्स्प्रेस सुमारे १ तास ४० मिनिटे, १२१०४ लखनौ–पुणे एक्स्प्रेस १ तास ३५ मिनिटे आणि १५०१८ गोरखपूर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १ तास १५ मिनिटे उशिराने धावणार आहे.

तसेच १९ सप्टेंबर रोजी १९०४६ थावे–सुरत एक्स्प्रेस १ तास ४० मिनिटे, तर १२३३५ भागलपूर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १ तास ३५ मिनिटे उशिराने धावणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

प्रवाशांनी वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा

यार्ड रिमॉडेलिंगच्या कामामुळे रेल्वे वाहतुकीत करण्यात आलेल्या या बदलांचा प्रवाशांना फटका बसू शकतो. त्यामुळे संबंधित तारखांना प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या गाडीचे अद्ययावत वेळापत्रक आणि गाडी सुरू आहे की रद्द झाली आहे, याची खात्री करूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Don't Try To Copy !!