लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

दर्शनाच्या रांगेत अचानक प्रकृती बिघडली; जयदीप मेघराज नेमाडे यांचा दुर्दैवी अंत

जळगाव/मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. जयदीप मेघराज नेमाडे असे मृत तरुणाचे नाव आहे. १७ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ११.४० वाजता ही घटना घडली.

जयदीप नेमाडे हे मित्रांसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आले होते. दर्शनाच्या रांगेत असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती समोर आली. प्रकृती अधिक खालावल्यानंतर त्यांना तातडीने मदत कक्षामार्फत रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार, जयदीप यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत काळाचौकी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूचे निश्चित वैद्यकीय कारण अधिकृत अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

जयदीप हे जळगाव शहरातील शिरसोली रोड परिसरातील जीवनमोती सोसायटीतील रहिवासी होते. त्यांचे वडील मेघराज सुभाष नेमाडे हे नेमाडे ट्रान्सपोर्टचे संचालक असल्याचे वृत्त आहे. जयदीप हे कुटुंबातील एकुलते एक पुत्र होते. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग तसेच एमबीएचे शिक्षण पूर्ण केले होते आणि ते पुण्यात नोकरी करत होते.

या आकस्मिक घटनेने नेमाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून जळगाव शहरातही हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबीयांनी दर्शन व्यवस्थेबाबत गर्दीच्या ठिकाणी अधिक योग्य नियोजन व पुरेशी वैद्यकीय सुविधा उपलब्ध असण्याची गरज व्यक्त केली आहे.

error: Don't Try To Copy !!