महाराष्ट्रातील १५० मतदारसंघात ‘भारत जोडो’ अभियान, विदर्भातील ४० मतदारसंघांचा समावेश!

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा घोळ अद्याप संपलेला नसला तरी भारत जोडो अभियानचे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जिंकवण्यासाठी राज्यातील १५० विधानसभा मतदारसंघात कामाला लागले आहेत. विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन भारत जोडो अभियान सुरू केले आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ पैकी २६ मतदारसंघावर कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रित केले होते. त्यापैकी २२ लोकसभेच्या जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला. अशाच प्रकारे विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी १५० जागावर भारत जोडो अभियानने काम सुरू केले आहे. यात विदर्भातील ४० मतदारसंघांचा समावेश आहे, अशी माहिती स्वराज इंडिया पक्षाचे संस्थापक व भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांनी दिली.

हरियाणाच्या निकाल अनाकलनीय

हरियाणाच्या निकालाबाबत यादव म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी पाच जागा मिळाल्या. विधानसभेत दोन्ही पक्षाला समान संधी होती. पण, येथे अनाकलनीय निकाल लागला आहे. त्यांचे विश्लेषण सुरू आहे. पण, महाराष्ट्रात स्थिती वेगळी आहे असे योगेंद्र यादव म्हणाले.

शिंदे सरकारची पोलखोल करणार

विधानसभेच्या १५० जागांवर भारत जोडो अभियानचे काम सुरू झाले आहे. गेल्या १० वर्षांत खूप मोठ्या प्रमाणात समाजात विष कालवण्याचे काम झाले आहे. ते विष काढून टाकण्याचे काम करायचे आहे. त्यासाठी महायुतीचे सरकार घालवणे आवश्यक आहे. गेल्या एक-दीड महिन्यात राज्य सरकारने खूप घोटाळे केले आहे. त्यांची पोलखोल भारत जोडो अभियानातून करण्यात येत आहे. शिंदे-फडणवीस सरकार कशा प्रकारे असंवैधानिक काम करीत आहे. हे लोकांना समजवून सांगितले जाईल, असेही ते म्हणाले.

निवडणूक आयोगाला पाठीचा कणा नाही, अशी टीका त्यांनी केली. तसेच त्यांनी मतदान यंत्रणावर देखील संशय व्यक्त केला. ‘व्हीव्हीपॅट’ सर्व मतदारांच्या हातात देण्यात आले पाहिजे, असेही ते म्हणाले.

फडणवीस यांच्या मतदारसंघात अभियान

भाजपकडे असंख्य कार्यकर्ते आहेत. तसेच या पक्षाकडे खूप पैसा आहे. त्यांचा नेटवर्कही उत्तम आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे पाठबळ आहे. त्यामुळे त्यांना प्रचार करणे सोपे जाते. काँग्रेसपक्ष केवळ कार्यकर्त्यांच्या भरवश्यावर आहे. विदर्भातील ४० मतदारसंघात भारत जोडो अभियानाचे कार्यकर्ते काम करीत आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दक्षिण-पश्चिम नागपूर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कामठी मतदारसंघांचा समावेश आहे.

संविधान बदलणे हाच भाजपचा हेतू

लोकसभा निवडणुकीत संविधान बदल या विषयाचा फटका बसल्याने भाजप सावध झाला आहे. ते आता या विषयावर उघडपणे बोलत नाहीत. पण त्यांचा हेतू संविधान बदल करणे हाच आहे. ते संवैधानिक प्रक्रियेचे पालन करीत नाहीत. हे आम्ही मतदारांना पटवून देत असल्याचे यादव म्हणाले.

error: Don't Try To Copy !!