
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. एका बाजूला महायुती, महाविकास आघाडी व तिसऱ्या आघाडीत जागावाटपावर चर्चा चालू आहेत, उमेदवाऱ्या जाहीर केल्या जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला,वेगवेगळ्या पक्षांनी, त्यांच्या उमेदवारांनी राज्यभर जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास निवडणूक आयोगाने उद्यापर्यंतची (२९ ऑक्टोबर) मुदत दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांना प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं. याद्वारे उमेद्वारांना त्यांची संपत्ती जाहीर करावी लागते. प्रतिज्ञापत्राद्वारे अनेक पक्षांच्या उमेदवारांची संपत्ती समोर आली आहे. या प्रतिज्ञापत्रांद्वारे निवडणूक आयोगाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीचे मलबार हिल मतदारसंघाचे उमेदवार मंगल प्रभात लोढा हे राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मंगल प्रभात लोढा यांची एकूण संपत्ती ४४७ कोटी रुपये आहे. २०१९ च्या निवडणुकीवेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे ४४१.६५ कोटी रुपयांची संपत्ती होती. पाच वर्षांत त्यात साडेपाच कोटी रुपयांची वाढ झाली आहे. लोढा यांच्याकडे २१८ कोटी रुपयांची स्थावर आणि २२८ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. लोढा हे मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी १९८० मध्ये मुंबईत लोढा ग्रुपची स्थापना केली होती, जी कंपनी आता मॅक्रोटेक डेव्हलपर्स म्हणून ओळखली जाते. श्रीमंतीच्या बाबतीत लोढा यांच्यानंतर शिवसेनेच्या (शिंदे) प्रताप सरनाईकांचा नंबर लागतो. त्यांच्याकडे ३३३.३२ कोटी रुपयांची संपत्ती आहे.
फोर्ब्सच्या माहितीनुसार मंगल प्रभात लोढा हे मूळचे राजस्थानचे रहिवासी असून ते मुंबईतील एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी मुंबईसह उपनगरांमध्ये अनेक रहिवासी व व्यावसायिक इमारती बांधल्या आहेत. प्रामुख्याने मध्यवर्गीय मुंबईकरांसाठी कमी दरांत घरं बांधण्याला ते प्राधान्य देतात. विधानसभेचे अध्यक्ष व भाजपाचे कुलाब्याचे विद्यमान आमदार राहुल नार्वेकर यांच्याकडे देखील बक्कळ संपत्ती आहे.
महाराष्ट्रातील इतर श्रीमंत उमेदवारांची यादी
क्र. उमेदवाराचे नाव. पक्ष. मतदारसंघ. एकूण संपत्ती.
- 1 मंगल प्रभात लोढा भाजपा मलबार हिल ४४७ कोटी
- 2 प्रताप सरनाईक शिवसेना (शिंदे) ओवळा-माजिवडा ३३३.३२ कोटी
- 3 राहुल नार्वेकर भाजपा कुलाबा १२९.८० कोटी
- 4 सुभाष भोईर शिवसेना (ठाकरे) कल्याण ग्रामीण ९५.९१ कोटी
- 5 जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी (शरद पवार) मुंब्रा-कळवा ८३.१४ कोटी
- 6 नजीब मुल्ला राष्ट्रवादी (अजित पवार) मुंब्रा-कळवा ७६.८७ कोटी
- 7 आशिष शेलार भाजपा वांद्रे पश्चिम ४०.२७ कोटी
- 8 राजू पाटील मनसे कल्याण ग्रामीण २४.७९ कोटी
- 9 आदित्य ठाकरे शिवसेना (ठाकरे) वरळी २३.४३ कोटी
- 10 देवेंद्र फडणवीस भाजपा नागपूर दक्षिण-पश्चिम १३.२७ कोटी