मुंबई: 17 फेब्रुवारी 2025 – मुंबई सत्र न्यायालयात आज वर्षा मधुसुदन सत्पाळकर आणि अन्य आरोपींविरुद्ध महत्त्वाची सुनावणी पार पडली. विशेष सत्र न्यायालय क्रमांक 20 मधील न्यायमूर्ती एन. जी. शुक्ला यांच्या समोर ही सुनावणी झाली. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा (EOW) आणि विविध गुंतवणूकदारांचे लक्ष लागून आहे.
राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील (SPP) प्रदीप घरत यांनी बाजू मांडली, तर एपीआय (EOW) श्री. सालुंके आणि पीसी श्री. डी. सुर्यभान हे देखील उपस्थित होते. गुंतवणूकदारांचे प्रतिनिधित्व करणारे अधिवक्ता एस. बी. भटगुनाकी आणि त्यांच्या संघाने युक्तिवाद केला. मात्र, आरोपी जामिनावर असूनही कोर्टात अनुपस्थित होते, याची नोंद घेण्यात आली.
यावेळी, सीए श्री. रविंद्र शिंगाडे यांनी मालमत्ता विक्रीसंदर्भातील अहवाल सादर केला, ज्याला “टॉर एक्झ.16” म्हणून चिन्हांकित करण्यात आले. या अहवालानुसार, राज्य सरकारने क्विकर रिअॅलिटी प्रा. लिमिटेड या वित्तीय आस्थापनेची नेमणूक केली आहे. मैत्रेया ग्रुप ऑफ कंपन्या या गटाच्या संलग्न मालमत्तांची लिलाव विक्री करण्यासाठी ही नेमणूक करण्यात आली आहे.
कोर्टाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 मार्च 2025 रोजी ठेवली असून, त्यापर्यंत लिलाव प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांबाबत सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
आर्थिक गैरव्यवहार, गुंतवणूकदारांची फसवणूक आणि मालमत्ता जप्ती यामुळे गाजत असलेल्या या प्रकरणाकडे सर्वांचेच लक्ष आहे. पुढील सुनावणीत लिलाव प्रक्रियेचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे.