बीड (प्रतिनिधी):
बीड जिल्ह्यातील एका खाजगी क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा दोन प्राध्यापकांनी विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने संबंधित पोलिसांना तातडीचे निर्देश दिले आहेत.
राज्य महिला आयोगाने बीड पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवून, संबंधित क्लासचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ ताब्यात घ्यावे, आरोपींना अटक होईपर्यंत क्लासची इमारत सील करावी, आणि इतर विद्यार्थिनींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडूनही अशा प्रकारच्या तक्रारी असल्यास त्याचा संवेदनशीलतेने तपास करावा, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
तसेच पीडित मुलीच्या तक्रारीची गंभीरतेने दखल घेऊन तिचे समुपदेशन करण्यात यावे, अशी ही

शिफारस आयोगाने केली आहे. आयोगाच्या अध्यक्षा यांच्या निर्देशानुसार हे पत्र पाठवण्यात आले असून, संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना या प्रकरणी त्वरित कारवाई करून अहवाल आयोगाकडे पाठवण्यास सांगितले आहे.
राज्य महिला आयोगाच्या सचिव दुर्गा माळी यांनी पाठवलेल्या या पत्रात, महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील अशा घटनांमध्ये तत्काळ आणि नियमबद्ध कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असून आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी तपास पथक तयार करण्यात आले आहे.