
जे. बी. एन. महाराष्ट्र न्यूज जामनेर
जामनेर | प्रतिनिधी
जामनेर-जळगाव रोडवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला असून, नगरपरिषदेकडून हजारो कोटी रुपयांचा खर्च करून करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची वास्तविकता आता उघड होत आहे.
(दि. 28 ऑगस्ट 2025) दुपारी समाजसेवक अविनाश बोरसे यांनी जामनेर-जळगाव रोडवरील प्रचंड खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी एक आगळावेगळा मार्ग निवडला. त्यांनी प्रत्यक्ष खड्ड्यात बसून “फोटोशूट” करून नगरपरिषद प्रशासन व ठेकेदारांच्या निष्काळजी कामावर तिखट टीका केली.
अविनाश बोरसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले:
“नगरपरिषदेकडून हजारो कोटी रुपये खर्च करूनही जामनेर-जळगाव रोडची अशी दयनीय अवस्था पाहून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ठेकेदार आणि नगरपरिषद अधिकाऱ्यांनी दर्जेदार काम न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.”
स्थानिक नागरिक, वाहनधारक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. तसेच, दोषी ठेकेदारांवर कारवाई करून भविष्यात दर्जेदार रस्ते बांधकाम व्हावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
