ऐन वन्यजीव सप्ताहातच नीलगायचा मृत्यू – वनविभागावर दुर्लक्षाचा आरोप

प्रतिनिधी / जब्बार तडवी, सोयगाव
दि. 07 ऑक्टोबर 2025

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा गावाजवळील पाझर तलावाच्या काठावर एक मादी नीलगाय मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना समोर आली आहे. ऐन वन्यजीव प्राणी सप्ताहातच ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, वनविभागाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

स्थानिक शेळीपालकांनी नीलगाय मृतावस्थेत असल्याची माहिती स्थानिक पत्रकारांना दिली. त्यानंतर पत्रकार घटनास्थळी पोहोचले असता, मोकाट कुत्र्यांचा मोठा झुंड मृत नीलगायचे अवशेष फाडताना दिसून आला. पत्रकारांना पाहताच कुत्र्यांनी तिथून पळ काढला.

या परिसरात काही दिवसांपासून वन्यप्राणी दिसत असूनही, वनविभागाने कोणतीही दक्षता घेतलेली नाही, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे वन कर्मचाऱ्यांच्या निष्क्रियतेवर पुन्हा एकदा बोट ठेवले जात आहे.

नीलगायचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, ऐन वन्यजीव सप्ताहात घडलेली ही घटना वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे.

error: Don't Try To Copy !!