जामनेर, ७ मार्च २०२५ (प्रतिनिधी: सुपडू जाधव, जे.बी.एन महाराष्ट्र न्यूज)
जामनेर नगर पालिकेने शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम गतिमान केली असून, याअंतर्गत अनेक रस्त्यांवरील हातगाड्या आणि टपऱ्या हटविण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या मते, शहराचे सौंदर्य राखणे आणि वाहतूक सुरळीत ठेवणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. मात्र, या कारवाईमुळे छोटे व्यावसायिक आणि हातगाडीधारकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून आहे. अचानक कारवाई केल्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. प्रभावित व्यावसायिकांनी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.
या परिस्थितीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप खोडपे पुढील दोन दिवसांत नगर पालिका प्रशासनाशी चर्चा करून व्यावसायिकांचे मत मांडणार असल्याचे सांगितले. तसेच, या कारवाईमुळे अडचणीत आलेल्या व्यावसायिकांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील अनेक नागरिकांनीही प्रशासनाच्या कठोर भूमिकेवर आक्षेप घेत, काही प्रमाणात सवलत मिळावी, अशी मागणी केली आहे. या मुद्द्यावर प्रशासन आणि स्थानिक नेत्यांमध्ये कोणता तोडगा निघतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.