पाचोरा – निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारिता हे लोकशाहीचे चौथे स्तंभ म्हणून ओळखले जाते, याचे जिवंत उदाहरण नुकतेच पाचोरा येथे पाहायला मिळाले पत्रकार संदीप महाजन यांनी अनधिकृत रेल्वे तिकीट एजंटकडून भारतीय सैनिकाची करण्यात आलेली आर्थिक लुबाडणूक उघडकीस आणताच संबंधित भामट्याने युद्धजन्य परिस्थिती काळात अफरातफरीत केलेली फसवणूक लपवण्यासाठी केवळ काही मिनिटांतच सैनिकाच्या खात्यात 1600 रुपये परत वर्ग केले.
ही घटना आहे पिंपरी सार्वे येथील रहिवासी आणि सध्या CISF मध्ये कार्यरत असलेल्या जवान प्रदीप बाविस्कर यांच्या बाबतीत. देशात युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यामुळे जवानांना तातडीने त्यांच्या सेवास्थळी परत हजर राहण्याचे आदेश मिळाले होते. या घाईत त्यांनी रेल्वे तिकीट काढण्यासाठी पाचोरा येथील तिकीट एजंटची मदत घेतली. मात्र त्या एजंटने एका सामान्य तिकिटासाठी वाजवी रक्कमेपेक्षा तब्बल 1600 रुपये जास्त रक्कम आकारून लुबाडणूक केली.या प्रकाराची माहिती पत्रकार संदीप महाजन यांना मिळताच त्यांनी या विषयावर सखोल चौकशी केली आणि समाजमाध्यमांद्वारे, तसेच ‘ध्येय न्यूज’च्या माध्यमातून ही धक्कादायक बातमी सर्वांसमोर आणली. पत्रकारितेतील जबाबदारी आणि लोकहितासाठी त्यांनी
दाखवलेली तत्परता पाहून ही बातमी काही वेळातच व्हायरल झाली. बातमीचा समाजावर, प्रशासनावर आणि संबंधित एजंटवर इतका परिणाम झाला की, संबंधित एजंटने काही मिनिटांत जवानाच्या खात्यावर 1600 रुपयांची रक्कम परत पाठवली.
ही घटना ही केवळ पत्रकाराच्या सचोटीची विजयगाथा नाही, तर हे एक जिवंत उदाहरण आहे की सत्याचे धारदार लेखणीसमोर अन्याय करणाऱ्यांची लाचारी उघड होते. पत्रकार महाजन यांनी या प्रकरणात कोणत्याही आमिषाला बळी न पडता, केवळ सैनिकाचा हक्क परत मिळावा या हेतूने ही बातमी उघडकीस आणली.या प्रकरणानंतर शहरातील जनमानसात पत्रकार महाजन यांच्या कार्याची भरभरून स्तुती होत असून अनेकांनी सोशल मीडियावर “हीच खरी पत्रकारिता” असे म्हटले आहे. शिवाय, यामुळे भविष्यात या आणि अशाप्रकारे लूट करणाऱ्या अनधिकृत रेल्वे एजंटांचा धसका बसेल व सामान्य नागरिकांची लुबाडणूक टळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रशासनाने सुद्धा या भामट्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. पत्रकारिता म्हणजे केवळ माहिती पोहोचवणे नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्याचे हत्यार आहे, याचे हे अत्यंत प्रभावी उदाहरण आहे.