ग्रामपंचायत अधिकाऱ्यास 40 हजारांची लाच घेताना अटक

जळगांव(प्रतिनिधी)
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ला.प्र.वि.) धुळे युनिटच्या पथकाने पारोळा तालुक्यातील तामसवाडी ग्रामपंचायतीचे अधिकारी दिनेश वासुदेव साळुंखे (वय 53) यांना 40,000 रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे.

तक्रारदार हे शासकीय बांधकाम ठेकेदार असून त्यांनी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत तामसवाडी येथे सुमारे 5 लाख रुपये किंमतीचे रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण केले होते. या कामासाठी 4 लाख रुपयांची देय रक्कम ग्रामपंचायतीकडून तक्रारदारांच्या खात्यावर जमा झाली होती.

या पार्श्वभूमीवर तक्रारदार आपल्या चुलत काकांसह 7 दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात इतर कामासंदर्भात गेले असता आरोपी दिनेश साळुंखे यांनी त्यांच्या खात्यात जमा झालेल्या रकमेच्या 10 टक्के म्हणजेच 40,000 रुपये लाचेची मागणी केली.

तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कळवली. त्यानंतर 19 मे रोजी पडताळणी करून पथकाने सापळा रचला. आरोपीने अंमळनेर येथील दगडी दरवाजा समोरील राजे संभाजी चौकात तक्रारदाराकडून 40,000 रुपये स्वीकारले आणि दुचाकीवरून पळून गेला. मात्र त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याची चौकशी सुरू आहे.

या कारवाईसाठी सापळा पर्यवेक्षण अधिकारी श्री. सचिन साळुंखे, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. धुळे आणि तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पो.हवा. राजन कदम व पो.कॉ. प्रशांत बागुल यांनी सापळा कारवाईत सहभाग घेतला.

संपूर्ण कारवाई मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परीक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

error: Don't Try To Copy !!