
जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर
जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील चिंचखेडा (तपोवन) येथील एका उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र खळबळ उडाली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत तरुणाचे नाव शेखर श्रीराम पाटील (वय २२) असे आहे. तो बी.एस्सी. शिक्षण पूर्ण करून शेती करत होता. आज सकाळी शेखर शेतात गेला, परंतु काही वेळाने त्याने शेतातच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ पोलिसांना याची खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उपविभागीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
शेखरच्या कुटुंबात आई-वडील आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. अभ्यासू आणि शांत स्वभावाचा म्हणून तो ओळखला जात होता. त्याच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
जामनेर पोलिस ठाण्याचे पथक पुढील तपास करीत आहे.
