
रेल्वे अपघातात जवानाचा दुर्दैवी मृत्यू ,मूळ गावी दोंदवाडे (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे शासकीय इतमामात अंत्यविधी पार पडला
प्रतिनिधी श्रीरामपूर – भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले वीर जवान गणर जयवंत दिलीप परदेशी (आर्मी क्रमांक- 21022154X) यांचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 16 जानेवारी 2025 रोजी रात्री 8.00 वाजता घडली. जयवंत परदेशी हे श्रीरामपूर येथे आपल्या आजी-आजोबांच्या भेटीसाठी आले असताना अचानक समोरून येणाऱ्या गाडीची धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची नोंद घेतली. जवानाचे पार्थिव शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, श्रीरामपूर येथे पाठवण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर भारतीय सैन्यदलाने त्यांच्या पार्थिवाला सन्मानपूर्वक त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. गणर जयवंत दिलीप परदेशी हे कलकत्ता येथे सैन्यदलात कार्यरत होते. सुट्टीसाठी श्रीरामपूर येथे आले असताना रेल्वे अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 7.15 वाजता त्यांच्या मूळ गावी दोंदवाडे (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे शासकीय इतमामात आणि चालीरीतीनुसार अंत्यविधी पार पडला. त्यानंतर आज 25 जानेवारी 2025 रोजी दशक्रिया विधी कार्यक्रम संपन्न झाला असून तेरवीचा बछडीचा कार्यक्रम मंगळवार, 22 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. घटनेनंतर नामदार गिरीश महाजन यांच्या पत्नी साधनाताई महाजन यांनी कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि कुटुंबाला धीर दिला. वीर जवान जयवंत दिलीप परदेशी हे कुटुंबातील एकमेव कमावते होते. त्यांच्या पश्चात आई-वडील व एक बहीण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली असून कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.