जामनेर (जि. जळगाव) – जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! वाघूर उपसा सिंचन योजना क्र. 1 अंतर्गत 2020 शेततळ्यांच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू असून, यामुळे जिल्ह्यातील शेतीला मुबलक पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा प्रशासनाने या योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विशेष मोहिम राबवली आहे.
शेतकरी आणि ग्रामस्थांशी थेट संवाद!
आज अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे, तहसीलदार नानासाहेब आगळे, तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी यांनी जामनेर तालुक्यातील विविध गावे भेट देऊन शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. या योजनेमुळे शेतीसाठी शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याने उत्पादनवाढीस मोठा फायदा होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा विशेष पाठपुरावा!
या प्रकल्पाची गती वाढावी आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा यासाठी जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन हे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने आढावा घेत आहेत. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी ते विशेष प्रयत्नशील आहेत.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेही लक्ष!
शेतकऱ्यांना वेळेत सिंचन सुविधा मिळावी आणि शेती समृद्ध व्हावी, यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील देखील प्रकल्पावर लक्ष ठेऊन आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांना काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी!
वाघूर उपसा सिंचन योजनेमुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांना सिंचनाच्या सुविधा मिळून शेती जलसंपन्न होईल. प्रशासनाने शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.