बीडच्या मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी – शिवसेनेच्या वतीने जामनेर पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांना निवेदन

जामनेर (प्रतिनिधी सुपडू जाधव) – बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला अनेक महिने लोटले असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडसह सर्व दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी जामनेर तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जामनेरचे पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार यांना निवेदन दिले.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेने संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे. तपासादरम्यान काही धक्कादायक फोटो समोर आले असून, आरोपींनी दाखवलेली क्रूरता पाहता, त्यांना जलदगतीने कठोरातील कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी शिवसेनेची ठाम मागणी आहे.

शिवसेना तालुका अध्यक्ष भरत पवार, उपजिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, शहर प्रमुख नरेंद्र धुमाळ, तालुका संघटक प्रवीण ठाकरे, गटप्रमुख सचिन सोनार, उपशहर प्रमुख खुशाल पवार, नितीन राजूरकर, विशाल, सुरेश चव्हाण आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

या मागणीची वरिष्ठ स्तरावर दखल घेतली जावी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा शिवसेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

error: Don't Try To Copy !!